१ जुलै हा दिवस ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो , पण हा दिवस फक्त कृषि दिन म्हणून साजरा करत नसून महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी त्यांच्या कृषि क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे कृषि दिवस
वसंतराव नाईक
आजच्या प्रगतशील महाराष्ट्रच्या कृषि क्षेत्राच्या विकासाला योग्य तो मार्ग दिला ते माननीय वसंतराव नाईक. ज्यांना आधुनिक महाराष्ट्र च्या कृषि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच ओळखलं जात , त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची वाट न सोडता, वसंतराव नाईक यांनी 1940 साली कायद्याची पदवी घेतली आणि काही काळ वकिली केली. मात्र लहानपणापासूनच शेती व समाजसेवेची गोडी मनात रुजली होती. याच प्रेरणेने ते राजकारणाकडे वळले. 1957 मध्ये त्यांना आपल्याच आवडीचं – कृषी खातं – सांभाळण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात मोलाचं आणि मूलगामी योगदान दिलं.
नोव्हेंबर 1963 मध्ये मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांच्या अकाली निधनानंतर, 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढील सलग 11 वर्षे त्यांनी हे पद भूषवले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद सांभाळणारे एकमेव नेते ठरले.
त्यांच्या काळात अनेक जनहितकारी निर्णय घेण्यात आले – जायकवाडी, उजनी, अप्पर वर्धा यांसारखी महत्त्वाची धरणं; तर कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, भुसावळ यांसारख्या मोठ्या विद्युत प्रकल्पांची उभारणी हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे ठरले. वसंतराव नाईक यांनी केवळ शेतीच नाही, तर ग्रामीण विकास, सिंचन, वीज, आणि समाजकल्याणाचा व्यापक विचार करत महाराष्ट्राच्या भविष्याला दिशादर्शन दिलं.
हरित क्रांती आणि वसंतराव नाईक यांचा मोलाचा सहभाग
१९६०च्या दशकात भारताला दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई आणि उपासमार यांचा सामना करावा लागत होता. अशा संकटसमयी देशात “हरित क्रांती” सुरू झाली – ही क्रांती म्हणजे आधुनिक बियाणं, रासायनिक खतं, सिंचन सुविधा आणि यांत्रिकीकरणाच्या साह्याने उत्पादनात मोठी वाढ घडवून आणण्याची एक व्यापक चळवळ होती.
वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात (1963–1975) देशात हरित क्रांती सुरू झाली. त्यांनी याची गरज ओळखून महाराष्ट्रात सुधारित बियाणं, खतं, सिंचन आणि कृषी विस्तार सेवांना चालना दिली. त्यांच्या काळात कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन मिळालं. आज वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे शिल्पकार मानलं जातं – कारण त्यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्य अनेक अन्नधान्य उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण झालं.
वसंतराव नाईक आणि कृषी विद्यापीठांची दूरदृष्टीपूर्ण उभारणी
वसंतराव नाईक यांनी शेतीच्या विकासासाठी केवळ योजना नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे, हे ओळखून महाराष्ट्रात कृषी विद्यापीठांची उभारणी केली. त्यांच्या पुढाकाराने १९६८ साली “महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी” ची स्थापना झाली. पुढे अकोला, परभणी आणि दापोली येथेही कृषी विद्यापीठं स्थापन झाली. ही विद्यापीठं संशोधन, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसाराद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
“या विद्यापीठाची स्थापना १९७२ मध्ये ‘मराठवाडा कृषी विद्यापीठ’ या नावाने झाली. त्यानंतर, कै वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, १ जुलै २०१३ रोजी त्यांना सन्मान देत विद्यापीठाचे नवे नाव ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी’ असे ठेवण्यात आले.



