Saturday, October 25, 2025
spot_imgspot_imgspot_img
₹0.00

No products in the cart.

Homeयशोगाथाडाळिंब शेती यशोगाथा : रामदास वारे यांनी साधलेले प्रेरणादायी यश

डाळिंब शेती यशोगाथा : रामदास वारे यांनी साधलेले प्रेरणादायी यश

डाळिंब शेती यशोगाथा : रामदास वारे यांनी साधलेले प्रेरणादायी यश

शेती म्हणजे केवळ मातीशी नातं नाही… ती एक जीवनशैली आहे – शिस्त, शास्त्र आणि सातत्याने घडवलेली यशाची कहाणी!” पुणे जिल्ह्यातील मेमाणवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी रामदास निवृत्ती वारे हे नाव आज डाळिंब शेतीतील यशाचे प्रतीक ठरले आहे. त्यांनी अनुभव, प्रयोग आणि चिकाटीच्या बळावर शेतीतून आर्थिक उन्नती साधली.

दहा एकरांत डाळिंब… सुरुवात एका आव्हानातून!

२०१२ हे वर्ष रामदास वारे यांच्या शेतीच्या प्रवासातील एक निर्णायक वळण ठरले. त्यांनी त्या वर्षी १० एकरांमध्ये ‘भगवा’ वाणाच्या डाळिंबाची शेती सुरू केली. डाळिंब हे नगदी पीक असून त्यातून मोठे उत्पन्न मिळवता येते, ही जाणीव असल्यामुळे त्यांनी संपूर्ण मनोभावे शेतीला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्याच टप्प्यात एक मोठा आघात बसला – झाडांवर तेल्या रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे त्यांचे सुमारे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

साधारणपणे अशी आर्थिक उलथापालथ कुणालाही खचवून टाकते. पण रामदास वारे यांनी ही अडचण हार मानण्याऐवजी शिकण्याची संधी म्हणून घेतली. त्यांनी अनेक तज्ज्ञ शेतकऱ्यांची भेट घेतली, कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले आणि डाळिंब शेतीसंबंधीचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आत्मसात केले. माती परीक्षण, पाणी नियोजन, फळबागेतील अंतराचे महत्त्व, हवामानाचा अभ्यास, कीड व रोग व्यवस्थापन अशा अनेक बाबतीत त्यांनी अभ्यास करून आपल्या बागेची दिशा बदलली.

 मातीपासून सुरुवात – यशाचे खरे सूत्र

वारे यांनी प्रत्येक झाडाच्या मुळांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचवण्यासाठी माती आणि पाण्याचे नियमित परीक्षण केले. १४ x ९ फूट अंतरावर झाडांची योग्य लागवड , वायुप्रवाह आणि फळधारणा निश्चित केली. हवामानाच्या अंदाजानुसार पाणी नियोजन केल्यामुळे उत्पादनात सातत्य आणि गुणवत्ताही टिकवता आली. दोन विहिरींसह नजिकच्या नदीवरून आणलेल्या दोन पाईपलाइनच्या मदतीने त्यांनी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण केली. या नियोजनामुळे ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा काटेकोर वापर करता आला, ज्यामुळे उन्हाळ्यातही बागेची झळाळी टिकून राहिली आणि फळांचा दर्जा चांगला राहिला. डाळिंबासोबतच वारे आपल्या शेतीत पीक वैविध्याला प्राधान्य देतात. ४ एकर क्षेत्रात त्यांनी ऊसाची लागवड केली आहे, जो नियमित उत्पन्नाचा मजबूत आधार ठरतो. यासोबतच, हंगामानुसार पालेभाज्यांची लागवड करून त्यांनी शेती अधिक फायदेशीर बनवली आहे. फूलकोबी , पालक, मेथी, कोथिंबीर , यांसारख्या भाज्यांचे नियोजनबद्ध उत्पादन घेतात. उन्हाळ्यात टरबूज आणि खरबूजासारख्या फळांची  लागवडही ते करतात. यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे व्यवस्थापन करता येते. या पीक विविधतेमुळे त्यांची शेती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि तगधार बनली आहे.

आज त्यांच्या बागेतून प्रति एकर १२ टनापर्यंत उत्पन्न मिळते. आणि बाजारात दर ५० ते १२० प्रति किलो मिळतो – म्हणजे डाळिंबाने आर्थिक समृद्धीचे दार खुले झाले!


कुटुंब – शेतीचा खरा आधारस्तंभ

या यशोगाथेमागे वारे कुटुंबीयांचा सततचा पाठिंबा हे खरे बळ ठरले. पत्नी जयश्री, लहान भाऊ सोमनाथ वारे आणि त्यांची पत्नी सीमा, तसेच मुलगा किरण. कुटुंबातील प्रत्येक सदस्य शेतीला केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानतात . किरणने कृषी शास्त्रात पदवी (B.Sc. Agriculture) घेतली असून, त्याच्या ज्ञानाचा उपयोग तो शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर करतो , केवळ वडिलांना तांत्रिक सल्ला देऊन थांबत नाही, तर शेतीतील नवे तंत्रज्ञान, बाजारातील बदलते दर आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करून स्वतःही शेतीमध्ये सक्रिय सहभाग घेतो. आज वडिलांसोबत खांद्याला खांदा लावत तोही योग्य पद्धतीने शेतीचे नियोजन आणि देखभाल करतो आहे.

प्रगतिशील बागायतदार – मेहनतीची पावती

रामदास वारे यांच्या आधुनिक आणि शास्त्रीय शेतीपद्धतीसाठी त्यांना YERRA कंपनीकडून ‘प्रगतिशील बागायतदार’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. ही केवळ व्यक्तिशः ओळख नव्हे, तर इतर शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक ठरली आहे.


 प्रेरणा कुठून घ्यायची? इथेच!

रामदास वारे यांची गोष्ट एक गोष्ट आहे संकटातून संधी उचलण्याची, शिस्तबद्ध व्यवस्थापनाची आणि कुटुंबाच्या पाठिंब्याची.
ही यशोगाथा दाखवते की शेतकऱ्याने जर शेती विज्ञानाशी जोडली, तर कोणतीही अडचण त्याला थांबवू शकत नाही!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments