पंढरपुर ची वारी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सोहळा आहे , आणि ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी सांस्कृतिक घटना आहे , सर्व भागातून , जिल्ह्यातून लाखो लोक या सोहळ्यात सहभागी होतात , आणि अगदी आनंदाने ही वारी पंढरपूर च्या दिशेने चालत राहते . वारीतील प्रत्येक गोष्ट ही पंरेपंरेनुसार होते मग ते रिंगण असो किंवा अश्व रिंगण असो . या वारीमध्ये अनेक परंपरा वर्षानुवर्षं पाळल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे ‘रिंगण’.
रिंगण म्हणजे वारीतील एक प्राचीन आणि आकर्षक परंपरा, जी वारकऱ्यांच्या थकव्यावर औषधासारखी असते. यात विशेष प्रशिक्षित घोडे पालखीसमोर शिस्तबद्ध पद्धतीने वर्तुळात धावतात. हे दृश्य भक्तांच्या श्रद्धेला उर्जा देणारे आणि उत्साहवर्धक असते.
रिंगणाची विशिष्ट ठिकाणे आणि त्यांचे महत्त्व
वारीतील रिंगण हे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर कुठे आणि कसे पार पडते, हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. दरवर्षी ठराविक गावांमध्ये रिंगण होतात आणि त्या ठिकाणांना विशेष पवित्र मानले जाते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील रिंगण स्थळे:
- चांदोबाचा लिंब
- बाजीराव विहीर
- वाखरी (पंढरपूरजवळ)
- माळशिरस
- ठाकुर बुवा समाधी (भंडीशेगाव)
ही सर्व ठिकाणं वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानली जातात. या गावांमध्ये रिंगण झाल्यावर पालखी थांबते, भक्तांसाठी भोजन व विश्रांतीचे आयोजन होते आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होतात.
संत तुकाराम महाराज पालखीतील रिंगण स्थळे:
- बेलवंडी
- इंदापूर
- अकलूज
- बाजीराव विहीर
- वाखरी
या ठिकाणीही रिंगण अतिशय भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडते. घोड्यांचे रिंगण बघायला स्थानिक गावकरी आणि दूरदूरून आलेले भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
वारीतील सगळ्यात मोठं आणि पवित्र रिंगण – वाखरी रिंगण
वारीचा अखेरचा आणि सर्वात उत्सवमय टप्पा म्हणजे वाखरी गाव.
पंढरपूरजवळचं हे छोटंसं गाव वारकऱ्यांच्या दृष्टीनं केवळ शेवटचं स्थान नाही, तर भक्तीच्या प्रवासाचं शिखर आहे. याच पवित्र भूमीवर पार पडतो वारीतील सर्वात मोठा, दिव्य आणि भावनिक रिंगण सोहळा – वाखरी रिंगण.
वाखरी रिंगण पाहणं म्हणजे प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न!या सोहळ्यात दिसते वारीची खरी ओळख: मानाच्या पालख्या ,टाळकरी ,मृदुंगधारी, तुळशीधारी महिला ,लाखो वारकरी
‘अश्व रिंगण’ – मानाचा सर्वोच्च क्षण
या भव्य रिंगणाचा शेवट होतो एका अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि थरारक क्षणाने – “मानाचा अश्व रिंगण”.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये कर्नाटकातील अंकली गावचे शितोळे सरकार यांच्या घोड्याला “मानाचा अश्व” मान दिला जातो.
ही परंपरा कधीच बदललेली नाही. संतकालापासून चालत आलेली ही गौरवशाली परंपरा आजही जपली जाते.’मानाचा अश्व’ शिस्तबद्ध आणि तेजस्वी धाव घेतो. त्याच्या पाठीवर उडणारी धूळ, वाऱ्यासारखी गती, आणि भक्तांच्या नजरेतील अश्रू – हे दृश्य वारीच्या श्रद्धेचं शिखर ठरतं.



