शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल शेती : शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवता यावे, यासाठी एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शेतकरी, महिला बचत गट तसेच शेतकरी गटांनी या शेतीशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतीशाळांचे वेळापत्रक आणि विषय
एप्रिल महिन्यातील शेतीशाळांमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे :
- ५ एप्रिल : पेरणीपूर्व तयारी, बेड तयार करणे, योग्य पद्धतीने बियाणे पेरणी, आंतरपीक पद्धती आणि बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी
- ८ एप्रिल : सेंद्रिय शेतीत वापरली जाणारी जैविक निविष्ठा – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती
- १५ एप्रिल : एकात्मिक कीड व्यवस्थापन – सापळा पिके, चिकट सापळे, पक्षी थांबे आणि जैविक उपायांचा वापर
- २२ एप्रिल : भात शेतीतील सुधारित तंत्र – डीएसआर (थेट पेरणी), श्री पद्धत आणि यांत्रिक लागवड
शेतीशाळेचे वेळ आणि प्रसारण
या सर्व शेतीशाळा संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन तसेच उमेदच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.
उपक्रमामागील उद्देश
हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. पावसातील अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर “हवामान अनुकूल तंत्रज्ञान” या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे ही वाचा : रॉकेल वाटप GR जाहीर : कोण पात्र, किती लिटर मिळणार? वाचा सविस्तर
