महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक डिजिटल सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने विकसित केलेला Agri Chatbot सध्या चाचणी टप्प्यात कार्यरत आहे, आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, कीडनियंत्रण, अनुदान योजना, पीक सल्ला यासह अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे मिळत आहेत. यामुळे या चॅटबॉटबाबत शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला आहे.
हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांना निर्देश दिले आहेत की, लवकरच हा चॅटबॉट WhatsApp प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
MahaVistaar App Rolled Out: महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘महाविस्तार’ मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. २१ मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झालेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीपूरक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार असून, ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यामध्ये मराठी भाषेतील चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकरी या चॅटबॉटला थेट प्रश्न विचारू शकतात आणि काही सेकंदांतच अचूक उत्तरं मिळवू शकतात. यामुळे शेतीसंदर्भातील तांत्रिक मार्गदर्शन सहज उपलब्ध होतं आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कामामध्ये मदत मिळते, असा राज्य सरकारचा दावा आहे.
चॅटबॉटमधून मिळणाऱ्या मुख्य सेवा
- बाजारभाव: जवळच्या बाजार समित्यांतील विविध पिकांचे दर.
- हवामान अंदाज: पावसाची शक्यता, तापमान, आर्द्रता यांची माहिती.
- पीक सल्ला: कोणत्या पिकासाठी कोणती काळजी घ्यावी, खत व फवारणी याबाबत मार्गदर्शन.
- अनुदान योजना: राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व अर्ज कसा करावा हे समजावून सांगणे.
- कीड-रोग नियंत्रण: कोणत्या रोगावर कोणती औषधं वापरावीत याची माहिती.
महाविस्तार अॅप वापरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये गूगल प्ले स्टोअर उघडून तिथे ‘MahaVistaar App’ असं शोधावं. अॅप सापडल्यानंतर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करावं.
इन्स्टॉल झाल्यानंतर अॅप उघडून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नोंदणी करताना शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो.
एकदा लॉगिन आयडी तयार झाला की, शेतकरी त्या माहितीच्या आधारे अॅपमध्ये लॉगिन करून त्यातील सर्व सुविधा सहज वापरू शकतात.