सोलापूर जिल्ह्यात लम्पीची संख्या वाढत असून एकूण 1100 पशुना लम्पीची लागण झाली आहे , त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांमध्ये ‘माझा गोठा , स्वच्छ गोठा’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे
जिल्ह्यामध्ये शासनामार्फत जनावरांना लसीकरण व औषधोपचार करण्यात येत आहे. ग्रामपातळीवरील समित्यांमध्ये सरपंच/प्रशासक, दुग्ध उत्पादक संघ, पोलिस पाटील, प्रगतिशील शेतकरी/पशुपालक, ग्रामसेवक आणि संबंधित पशुधन अधिकारी यांचा समावेश देखील आहे. यामुळे अचूक माहिती, कार्यक्षम अंमलबजावणी, आणि स्थानिक पातळीवर त्वरित उपाययोजना शक्य होत आहेत. शिवाय, या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था सहभागी करून घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
लम्पी नियंत्रणासाठी तालुकास्तरावरील समित्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावरून आवश्यक औषधं, लसीकरण साहित्य, पीपीई किट्स आदींचं वाटप या यंत्रणांद्वारे केलं जात आहे. या पथकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून, गावपातळीवरही जनजागृतीसाठी कार्यक्रम आखण्यात येत आहेत.

लम्पी जनावरांचा शोध
लम्पी बाधित जनावरांचा शोध घेण्यासाठी प्रशासन ‘ट्रेस, ट्रॅक व ट्रीट‘ या त्रिसूत्रीचा वापर करत आहे. बाधित पशुंच्या संपर्कात आलेल्या इतर जनावरांची ओळख पटवून त्यांची तपासणी, चाचणी, उपचार आणि लसीकरण तातडीने करण्यात येत आहे. या भागातील गोठे व परिसरही निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहेत
या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने डास, माश्या, गोचिड, चिलटे यांसारख्या कीटकांमधून होतो. याशिवाय, बाधित जनावरांच्या संपर्कातील जखमा, नाकातील स्त्राव, व उपयोगात आलेल्या वस्तूंमधून देखील हा आजार पसरतो. एकदा संसर्ग झाला की, संपूर्ण गोठ्यामध्ये वेगाने फैलाव होण्याची शक्यता असते.
लक्षणे:
- उच्च तापमान (सुमारे 104-105 अंश फॅरेनहाइट)
- शरीरावर 2.5 ते 5 सेमी आकाराच्या गाठी निर्माण होतात – विशेषतः मानेवर, खांद्यावर, पाठीवर
- पायांवर सूज, चालण्यात अडथळा
- दूध उत्पादनात घट
- भूक मंदावणे, उदासीनपणा
- काही प्रकरणांमध्ये डोळ्यातून व नाकातून स्त्राव, आणि त्वचेवर खोल जखमाही दिसून येतात
प्रतिबंधात्मक उपाय
लंम्पी त्वचा आजार हा अतिशय संसर्गजन्य असून वेगाने फैलाव होतो. त्यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास आजाराचा प्रादुर्भाव रोखता येतो. खाली दिलेले उपाय काटेकोरपणे पाळावेत:
निर्जंतुकीकरण:
- गोठ्यात दररोज सोडियम हायपोक्लोराईड (Sodium Hypochlorite) फवारणी करावी.
- आठवड्यातून एकदा १% फॉर्मालीन (Formalin 1%) वापरून गोठ्याचे, अन्नपात्रांचे आणि पाण्याच्या टाक्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
जनावरांचा संपर्क टाळा:
- आजारी जनावरे त्वरित वेगळी करून इतरांपासून वेगळे ठेवावीत.
- त्यांच्याशी वापरलेली भांडी, दुपट्टे, साखळी, दोरी इ. वस्तू इतर जनावरांना वापरू नयेत.



