महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ : महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने महिला स्वयं-सहायता गटांच्या उत्पादनांसाठी कायम स्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या उद्देशासाठी ‘उमेद मॉल‘ या केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानांतर्गत पाजिला टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल‘ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिलांच्या वस्तू व उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. उमेद मॉल उभारण्यासाठी सरकारने 200 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे.
वैशिष्ठ्ये
- पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये जिल्हा विक्री केंद्रे सुरू केली जाणार असून, यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- प्रत्येक जिल्ह्यात किमान 20 हजार चौ.फुट क्षेत्रफळाचे मॉल उभारले जाणार असून, जागेची निवड जिल्हा परिषदेमार्फत केली जात आहे.
- या उपक्रमामुळे महिला बचत गटांना १२ महिने स्थिर बाजारपेठ, वाढते उत्पन्न आणि आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळणार आहे.
आतापर्यंत महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तात्पुरत्या प्रदर्शनांवर अवलंबून राहावे लागत होते. आता मात्र त्यांच्यासाठी १२ महिने सुरू राहणारी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने विक्रीची सातत्यपूर्ण संधी मिळेल. यामुळे महिलांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता मजबूत होईल. तसेच बँकांच्या सहकार्यामुळे महिलांना लघुउद्योजकतेसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळत असून, त्यातून व्यवसाय विस्ताराला चालना मिळणार आहे.
ग्रामसखी पद व गणवेश
उमेद अभियान थांबविले जाणार नसून ते सातत्याने सुरू राहणार आहे. या अभियानातील कर्मचाऱ्यांना ग्रामसखी पद व गणवेश दिला जाईल, तसेच गणवेशाचा प्रकार कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने ठरवून प्रशासन मान्यता देईल.

पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानुसार पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी 3 मॉल, कोकण, अमरावती व नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी 2 मॉल, तर नाशिक जिल्ह्यात 1 उमेद मॉल उभारण्याचा प्रस्ताव आहे.तसेच महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उमेद मार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाइन माध्यमांचा वापर केला जाणार आहे.


